Sunday, July 12, 2009

ओळख प्राचिन साहित्याची

भारतीय हिंदू साहित्य हा एक मोठा अनाकलनिय असा ज्ञानसागर आहे ज्यात अनेक भारतीय व परदेशी विद्वानांनी अवागहन केले आहे. त्यातुन असंख्य अशी ज्ञानरत्ने बाहेर काढली आहेत. आपले भारतीय साहित्य हे अनेक ज्ञानशाखां, कला, विद्या यांची खाण आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेखनीय असे आपले वैदीक साहित्य येते ज्यात जगातील सर्व ज्ञानशाखा तर सापडतातच पण ह्या जगाची उत्पत्ती, ईश्वराविषयीचे तत्वज्ञान, व ह्या जगात जगण्याविषय़ीचे व्यावहारिक ज्ञानही मोठ्याप्रमाणात सापडते. अनेक ग्रंथांची नावे व अनेक गोंधळातुन आपल्याला नेमका प्रश्न पडतो की हे नक्की काय आहे ह्या साहित्याची उत्पत्ती व वर्गिकरण कसे केले जाऊ शकते. मलाही असाच विचार पडला व त्यातुन हा लेखन प्रपंच घडला.
आपले प्राचिन साहित्य हे वेद, ब्राह्मणके, अरण्यके, उपनिषदे, वेदांत, जेमिनीय व बादरायण, पुर्व व उत्तर मिमांसा, षडदर्शने, त्यानंतर पुराणे, व महाकाव्ये महाभारत, रामायण इ. हे अंतर्भुत होतात.
आपण नेहमी पुराणातील वांगी पुराणात असे म्हणुन आपण ह्या साहित्याकडे दुलर्क्ष करतो. पण ह्यात जे ज्ञान भरलेले आहे. ते परदेशी विद्वानांनी जास्त ओळखले आहे. व त्यावर संशोधने चालू आहेत. मोठ्याप्रमाणावर ह्या दुलर्क्षाचा आपल्याला तॊटा ह्यामुळे सोसावा लागत आहे. आज जर आपल्याला आपला प्राचिन ग्रंथ व सर्वात महत्वाचा असा 'ऋग्वेद' वाचावयाचा असेल तर तो मॅक्स मुल्लर ह्या जर्मन विद्वानाने संपादित केलेला जर्मनिवरुन मागवावा लागतो. ह्या जर्मन विद्वानाने अनेक संस्कृत ग्रंथांचे जर्मनीमध्ये भाषांतर केले आहे. व इतरही ग्रंथांची हिच अवस्था आहे. कालांतराने श्री स्वामी दयानंद सरस्वतींसारखे आधुनिक ऋषी जन्माला आले व त्यांनी वैदिक साहित्याचे पुर्नज्जिवन केले. आणि वैदीक ज्ञानावर श्री स्वामी विवेकानंद यांनी मोठ्याप्रमाणात काम केले परंतू हे वैदिक ग्रंथ मुळस्वरुपातील खुप कमी प्रमाणात मुद्रीत २करण्यात आले व त्यावर आपले आद्यग्रंथ म्हणुन लोकांचे साहित्यीकांचे लक्षही कमीच राहिले. एकूणच आपल्या प्राचिन ज्ञानाविषयीची आपली अनास्था अजुन बदललेली नाहीये.
व्यावहारिक फ़ायदा नसलेले म्हणुन त्यांची कायमच उपेक्षा होत राहिली आहे, पण जेव्हा ह्या ग्रंथ विस्ताराचा आपण विचार करु तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या प्राचिन साहित्यात आज प्रचलित असलेल्या सर्व विद्या व कलांचा उल्लेख आपल्याला सापडतो.
ह्याबद्दल भृगु संहितेतील एक श्लोक खुप महत्वाचा ठरतो.
यद्यत्स्याद्वाचिकं सम्यक्कर्म विद्येती संज्ञितम शक्तो मूकोपि यत्कर्तु कलासंज्ञं तत्तस्त्मृतम
विद्या त्यनंताश्च कला: संख्यातुं नैव शक्यते विद्या मुख्यातु द्वात्रिंशश्चतु: पाष्टि कला स्मृता (भृगु संहिता)
म्हणजेच एखादे काम कसे करता येते येते ह्याचे विवेचन करता येते तेव्हा त्यांस विद्या (आजच्या भाषेत शास्त्र) व नुसते काम करता येते पण त्याची कारणमिमांसा करिता येत नसल्यास त्यास कला असे म्हणतात. एकूण बत्तीस विद्या व चौसष्ट कला प्रमुख आहेत. ह्यांसर्व विषयावर संपुर्ण प्रकाश टाकणारे एक पुस्तक सध्या उपलब्ध आहे. वरदा प्रकाशन पुणे यांनी ते "प्राचिन हिंदी शिल्पशास्त्र" ह्या नावाने प्रकाशित केले आहे. आणि ह्या कला व विद्यांचे ज्ञाते उद्गाते ह्यांची यादी मानसारम नावाच्या वास्तूशास्त्रावरिल ग्रंथात सापडते.
विश्वकर्मा च विश्वेश: विश्वसारं प्रबोधक: वृतश्चैव मयश्चैव त्वष्टा चैव मनुर्नल:
मानविन्मानकल्पश्च मानसारो बहुश्रुत:प्रष्टा च मानबोधश्च विश्वबोधो नायश्च तथा
आदिसारो विशालाश्च विश्वकाश्यप एव च वास्तुबोधो महातन्त्रो वास्तुविद्यापतिस्तथा
पाराशरीयकश्चैव कालयुपो महाऋषी:चैत्याख: चित्रक: आवर्य साधकसारसंहित:
भानुश्चेंद्रश्च लोकज्ञ: सौराख्य शिल्पिवित्तम: तदेव ऋषय: प्रोक्ता द्वात्रिंशति संख्यया
(मानसारम अध्याय ६८, श्लोक ५ ते ९)
म्हणजेच विश्वकर्मा, विश्वे, विश्वसार, प्रबोधक, वृत्त, मय, त्वष्टा, मनु, नल, मानविन, मानकल्प, मानसार, प्रष्टा, मानबोध, विश्वबोध, नय, आदिसार, विशाल, विश्वकाश्यप, वास्तुबोध, महातन्त्र, वास्तुविद्यापति, पाराशरीयक, कालयुप, चैत्य, चित्रक, आवर्य, साधकसार, भानु, इंद्र, लोकज्ञ, सौर, असे एकूण ३२ ऋषी शिल्प म्हणजेच वेगवेगळ्या शास्त्रांचे ज्ञाते म्हणुन ऒळखले जातात. ह्यांपैकी काही जणांचे साहित्य आज उपलब्ध आहे.
अजुन अनेक दाखले दिले जाऊ शकतात ज्यात आपल्या प्राचिन कला व त्यांचा विस्तार दिला आहे.
अश्याप्रकारे व्यावहारिक उपयोगाचेही ज्ञान आपल्या प्राचिन ग्रंथामध्ये होते हे आपल्याला मान्य करावे लागते. आज काहीप्रमाणात का होईना वास्तुशास्त्राचे पुर्नज्जिवन चालू आहे. व त्यासंबंधीत प्राचिन संस्कृत ग्रंथांचे संशोधन, पुर्नमुद्रण, जतन करण्याचे कार्य चालू आहे.
विस्तार भयास्तव आपण हा विषय येथेच ठेऊन मुळ विषयाकडे वळू.
अनेक इतिहास तज्ञ जसे सांगतात त्याप्रमाणे आर्य जे मध्य पुर्वेमधुन संपुर्ण जगामध्ये स्थायिक जाहले. ते सात भागांमध्ये वर्गिकृत केले जातात. हिंदू, पार्शियन, ग्रिक, रोमन, सेल्ट्स, टुटॉन्स, आणि स्लेव्स, ह्यांच्याबद्दल मनूस्मृतीमध्ये उल्लेख सापडतात.
दोन मोठ्या पर्वतांमधील भुमी जी आर्यवर्त म्हणुन ओळखली जाते . आर्य म्हणजेच उत्तम, सर्वश्रेष्ठ असा होय व त्या लोकांची भुमी म्हणजेच आर्यावर्त होय़. हे आर्य २५०० ई.स. पुर्व दरम्यान भारतात स्थायिक झाले असे समजले जाते. तेथे सिंधू, गंगासारख्या नद्यांच्या काठावर त्यांनी वसत्या स्थापन केल्या. भारतीय इतिहासाची सुरुवात होते तीच मुळात आर्य व स्थायिक लोकांच्या युध्दांपासुन. हे आर्य जे उंच व देखणे, गोरे असे जसे की आजचे सिंधी लोक, उत्तर भारतात प्रवेश करते झाले व पुढे. त्यांनी संपुर्ण भारतात आपले बस्तान बसविले. ह्याच लोकांनी येथे आल्यावर ऋग्वेदाची निर्मिती केली असे समजले जाते. मुलत: जरी वेद हे अपौरुषेय समजले जात असले तरी त्यांची निर्मिती. ह्या आर्यांच्या काळात झाली आहे. प्रथम ऋग, नंतर गायनात असलेले मंत्र म्हणजेच सामवेद व त्यानंतर अथर्व व शेवटी काळे व गोरे यांनी मिळुन म्हणजेच आर्य व आर्यतर स्थानिक यांनी मिळून बनलेला हा यजुर्वेद होय. ह्या वेदांच्या निर्मिती नंतर त्या वेदांचे अर्थ व स्पष्टीकरणे आपापल्या मतानुसार मांडण्याची परंपरा निर्माण झाली त्यातुन प्रथम उच्च विद्वान ब्राह्मणांनी रचल्याने ब्राह्मणके अशी संज्ञा प्राप्त झाली. त्यालाच आपण ब्रांह्मणांनी सांगितलेले असे मराठीत म्हणू शकतो. नंतर अरण्यात राहाणार्या ऋषींनी लिहिलेली अरण्यके. यानंतर उपनिषदे रचली गेली उपनिषदे म्हणजेच अक्षरश: योग्य अश्या वातावरणात वेदातील सुत्रांचे चिंतन करणे असा होय मुख्यत: ही प्रश्नोत्तर स्वरुपात आहेत. शिष्य वा मुमुक्षु प्रश्न विचारतात गुरु अथवा अध्यात्मिक उन्नत प्रश्नांची उत्तरे देतात अशी ह्या उपनिषदांची रचना आहे. याच पध्दतीने नंतरच्या काळात काही उपनिषदांची रचना झाली जी वैदीक साहित्याशी संबंधीत नव्हती जसे की अकबराच्या काळात रचले गेलेले अल्लोपनिषद जे ऋग्वेदाचा भाग असल्याचे सांगितले जाते. किंवा वास्तुशास्त्रोपनिषद नावाचा संस्कृत ग्रंथ जो मुलत: उपनिषद नाही.
ह्या नंतर उपनिषदांतील आत्मा, निर्मिक, विश्वनिर्मिती त्याचे चलन वलन, आणि मन आणि पदार्थांचे आपापसात असलेले नाते समजावणारे तत्वज्ञान हे वेदांताचे मुळ आहे. उपनिषदांनंतर पुर्व मिमांसा व उत्तर मिमांसा असे दोन वेदांताचे भाग निर्माण झाले. ज्यापैंकी उत्तर मिमांसा जास्त प्रसिध्द झाला. कर्म धर्म सिध्दांत हा ह्या तत्वज्ञानाचा मुख्य भाग समजला जातो.
मागच्या जन्मात केलेल्या कर्मामुळॆ पुर्नजन्म येतो. त्या जन्मात इच्छा (षडरिपु) त्या मानवाचा ताबा घेतात. व त्यांतुन पुन्हा पुर्नजन्म प्राप्त होतो. व हे दुष्ट चक्र चालुच राहाते.
व ह्या नंतर तत्वज्ञानाचा उच्चांक गाठणार्या सहा दर्शनांची निर्मिती झाली. ह्यामध्ये व समकालिन ग्रिकांच्या तत्वज्ञानात साम्य आढळते.
श्री सर मोनियर विल्यम्स आपल्या ग्रंथात म्हणतात की,
''Indeed, if I may be allowed the anachronism, the Hindus were Spinozites more than two thosand years before Spinoza, Darwinians many centuries before Darwin, and Evolutionists many centuries before any word like evolution existed in any language in the world.''(Brahmanism and Hinduism)
सांख्य तत्वज्ञान हे सर्वात जुने असे तत्वज्ञान आहे. हे कपिल ऋषींनी निर्माण केले. हे त्यांचे दर्शन म्हणजेच सांख्य तत्वज्ञान हे आधुनिक बुध्दीप्रामाण्यवादच आहे. त्यांनी आत्तापर्यंत चालत आलेल्या विश्वनिर्मितीच्या सर्व सिध्दांताना बाजूला सारले. त्यांच्याकाळापर्यंत जे ईश्वराचे स्वरुप एकेश्वरापासून जे त्रिदेवांच्या आराधने पर्यंत आले होते व पुढे ते अनेकदेवत्वात परिणीत झाले. त्याचा धिक्कार केला आहे. सांख्य मतानुसार हे विश्व हे त्याच्या नैसर्गिक गुणांमुळे स्वत:च निर्माण झालेले आहे. व सर्व सजिवांच्या भावना, संवेदना ह्या त्यांच्या शरिराच्या यांत्रीक प्रक्रीयांमुळे निर्माण होतात.
पाश्चात्य विद्वान प्रा.ई.डब्लु. होपकिन्स म्हणतात की ग्रिक तत्वज्ञ प्लेटो ह्याने भारतीय सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. कारण पुढे निर्माण झालेल्या प्लेटोच्या तत्वज्ञानाच्या अनेक उपशाखांमध्ये सांख्यमताचे अवषेश सापडतात.
पतंजलींचे योगीक तत्वज्ञान हे इतर काही नसून अधिभौतिक सांख्य तत्वज्ञान आहे. त्यात त्यांनी हे तत्वज्ञान मनोकायीक व्यायामाशी जोडले आहे. पतंजलींच्या मतानुसार आपण जर आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवून आपले मन विशिष्ट बाबींवर केंद्रित केले तर आपण अनेक सिध्दींचे मालक बनतो.
ह्यानंतर येतात ती अठरा पुराणे, ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव/वायु, श्रीमद्भागवत, देवीभाद्भवत, नारद, मार्कण्डेय, अग्नेय, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वाराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्माण्ड, ही अठरा पुराणे होते याशिवाय अनेक उपपुराणे आहेत. ह्यातील साम्यत्वाचा एकच मुद्दा म्हणजे ह्यात उल्लेखलेला प्रत्येक देव हा त्या त्या पुराणानुसार सुष्टीकर्ता आहे. किंवा अनेक बुध्दीला न पटणार्या कथांनी ही पुराणे भरलेली आहेत. परंतू त्याच प्रमाणात विचार करायला लावणारे अनेक मुद्दे त्यांत आहेत. नारद पुराणांमध्ये अनेक मोठमोठी अवकाशीय गणिती सुत्रे आहेत. गरुड पुराणांत रत्नशास्त्रावर विस्तृत विवेचन आहे. जवळ जवळ प्रत्येक पुराणांत आपल्या देशांच्या व आसपासच्या बहुतांश देशांच्या भुगोलाबद्दल प्रचंड माहिती आहे. एकूण ही पुराणे गोष्टीरुप असलेली विश्वकोष आहेत. ज्यात प्रचंड माहितीचा सागर आहे. फ़क्त बुद्धीला न पटणार्या कथांमुळे आपण त्यांपासुन दुर आहोत. त्या कथांना सध्या बाजुला ठेऊन आपण त्यातील ज्ञानाचा वापर करुन घ्यावा असे मला वाटते.
अश्याप्रकारे वैदीक साहित्य प्रचंड तत्वज्ञान, व्यावहारिक ज्ञान, कला ह्या माहितीने भरलेले आहे. अनेक विषयानुसार आपण त्याचा परामर्श आपण क्रमश: घेतच राहु. तोपर्यंत आपल्यातील निर्मिकास माझे अनंत नमस्कार,
सुरेश चं खोले (BA, Dip In Vastushastra)

No comments: