Saturday, June 5, 2010

Me Ani Sangama

२० मे २०१० हा माझ्या आयुष्यातला एक वेगळाच दिवस म्हणुन मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. ह्या दिवशी मी सध्या अनेक संगणक तांत्रींकी व इतर उच्चशिक्षीत नवस्नातकांचे स्वप्ननगर आहे त्या ठिकाणी एका लैंगिक अल्पसंख्यांक व्यक्तिंसाठी कार्य करणार्या एका सामाजकार्य संस्थेत पोहोचलो.
हि संस्था संपुर्ण कर्नाटक राज्यात कार्य करते ह्यांच्ये कार्यक्षेत्र, लैंगिक अल्पसंख्यांक(हिजडा, कोथी, गे, लेसाबियन, जोगप्पा,लैंगिकसेवा देणारे इ.) साठी कार्य करणारी ही भारतातील दुसर्या क्रमांकाची संस्था म्हणता येईल. प्रथम क्रमांक नाज फ़ोंन्डेशनचा लागतो. लिंग आणि लिंगभाव ह्यांच्याशी सामाजिक घटीतांच्या माध्यमातुन आणि विशिष्ट मानस-सामाजिक घटितांच्या परिपाक म्हणुन निर्माण झालेले अनेक ’विचलीत’ ह्या ठिकाणी मला पहावयास मिळाले. अनेक अश्या विचलितांच्या आयुष्यात डोकावता आले. पहिल्या आठवड्यातच मी त्यांच्यात मिसळुन गेलो.
जेव्हा मी अश्या सर्व विचलितांना एकत्र एका उदासिन/अहस्तक्षेपी दर्शकाच्या भुमिकेतुन पाहाताना मला स्त्री अभ्यास केंद्रातील अनेक लेखीकांची/विचारकांची अनेक वचने आठवु लागली. लिंगभावच नव्हे तर लिंग हे कसे रचित आहे ह्याचा उत्तम पुरावा येथे अनेक परालिंगी/परालिंगभावधारी (स्त्री->पुरुष/पुरुष->स्त्री) व अनेक विविध प्रकारच्या लैंगिकता आणि त्यांची अनेक
अर्थातच हि संस्था लैंगिंक अल्पसंख्यांकांसाठी कार्य करते त्यामुळे ह्या संस्थेच्या सदस्यांमध्ये ह्याच सर्व लोकांची संख्या लक्षणीय आहे.ह्या संस्थेच्या मुख्य कार्यालयात मला एक महिना वावरत असल्यामूळे मला अनेक नविन बाबीं कळणार होत्या ह्याची नांदी पहिल्याच दिवशी मला दिसली होती.

मी संस्थेच्या आवरात प्रवेश करताच मला प्रथमच भेटली ती ’चांदणी’(पुरुष-->स्त्री), हि आपल्या वयाच्या २१-२२ व्या वर्षी पार्थिव संस्काराने स्त्री बनलेली आहे. त्या आधी तो म्हणुन जगलेली चांदणी माझ्याशी तिच्या आयुश्यात तिने सहन केलेल्या अनेक बाबींबद्दल बोलली. चांदणी म्हणजे दाक्षिणात्य ’सावळा’ रंग ५’७”उंची असलेली एक धिप्पाड स्त्री अगदी घनदाट, काळेभोर केस. दणदणीत आवाज, अश्या प्रथमदर्शनी जरा विचित्र/भयंकर वाटणारे प्रकरण. पण माणुस म्हणुन चांगली असणारी चांदणी संगमामध्ये ७ वर्षापेक्षा जास्त काम करते.

दुसरा भेटलेला म्हणजे वास्तविक आधी(प्लेनेट रोमीयोवर) भेटलेलेला रेमंड का जाणे का पण मला ह्याचे अस्तित्व येथे खटकत आहे. हा नुकताच येथे आलेला. काही दिवसांपुर्वि(३महिने) ह्या संस्थेमध्ये रेमंडला विशिष्ट पद नाही परंतु त्याला येथे अनेक अधिकार आहेत. अनेक महत्वाच्या पदांचे अधिकार तो सतत वापरत असतो. आणि अश्या हरहुन्नरी माणासांची येथे आवश्यकता आहे. हा एक सर्व सामान्य दिसणारा परंतु समलिंगी संबंधांची आवड असणारा एक ३० वर्षाचा तरुण. सर्व गोंधळात ह्याने मला खुप मदत केली मी ह्याच्या बरोबरच राहात आहे.

अक्काईअम्मा हि एक महत्वाच्या माहिती कक्षासाठी कार्य करणारी आणखी वेगळी व्यक्ति, हि पुरुष->स्त्री आहे. माहिती विभागात काम करताना अनेक इतरही बाबींवर तिला काम करावयाचे असते. बहुतांश स्त्रैणवृत्ती असणारी हि स्त्री काही अंशी अधिकारी कार्यात आपला मुळ पुरुषी स्वभाव दर्शवितेच. माहिती पुरवठा करताना अनेक नविन व्यक्तिंशी ओळख करुन घेणे व संगमाची ऒळख करुन देणे हे हिचे काम आहे.

नंतर नंदीश, आणि कुमार हे दोघे कोथी व्यक्तिमत्वे परिधान केलेले दोन पुरुष आहेत. काही काळापुरुते त्यांना स्त्रीवेष धारण करणे आवडते आणि तो काही समाजाच्या कार्यक्रमात करतातही. अश्या ह्या दोन व्यक्तिमत्वांबाबत काय सांगावे. ह्यांनबरोबर पुढे दोन दिवस मैसुर जवळच्या एका गावी जाण्याचा प्रसंगही आला. तेव्हा त्या दोघांच्या संपुर्ण व्यक्तिमत्वात असलेला ’तो’ प्रकार मला पहायला मिळाला.

सोनू, ख्रिस्ती, कानन, हे तिघे म्हणजे पुर्वायुष्यातल्या मुली आणि सद्यलिंग पुरुष. हा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला स्त्री समलिंगी माझ्या पाहाण्यात आहेत. एक दोन मैत्रीणीही पण हा प्रकार नविनच होता स्त्री-परालिंगी व्यक्तिमत्व. तेही पार्थिव संस्कार केलेले. ही बाब जरा जास्तच वाटत होती पण जेव्हा मी ह्या तिघींबरोबर खुप चर्चा केली तेव्हा बर्याच लक्षात आल्या. स्त्रीत्वाच्या आणि पुरुषत्वाच्या मर्यादा आणि ज्या प्रस्थापित रचना आपण ’सामान्य’ माणसे जगतो त्या सर्व रचना मर्यादा येथे तुटताना दिसत होत्या. स्त्रीया अनेक ’पुरुषी’ वाटणारे संकेत दर्शवित होत्या आणि पुरुष स्त्रैण संकेत. मुळ रचनेत असणारे लिंगभावाचे सगळे उपचार पलटताना दिसले.
अशी आणि अनेक नविन व्यक्तिमत्वे मला येथे पहिल्याच दिवशी सकाळीच पहायला मिळाली त्यातिल फ़क्त काहींचेच वर्णन मी येथे देत आहे.

असा हा पहिला दिवस संपला. . .

Monday, February 15, 2010

ज्योतिष आणि अध्यात्म...

ह्या वेळी मला ह्या दोन प्राचिन भारतीय हिंदू ज्ञानशाखांवर प्रकाश टाकावा असे वाटले, आधी ह्यावर लिखाण करण्याचे अनेक प्रयत्न मी केले होते परंतू काही कारणास्तव ते पुर्णत्वास जाऊ शकले नाहीत. ह्यावेळी निर्मिकाने साथ दिली व हा लेखन अंश आपल्या हाती आला.
ह्या दोन ज्ञानशाखांबद्दल सामान्य जनांच्या मनात कायमच संभ्रमाचे वातावरण असते. त्या संभ्रमानेच मी कायम अस्वस्थ होतो. आणि त्या संभ्रमाचे कारण दोन्हींही बाबत असलेले एक गुढतेचे वलय हेच आहे असे मला जाणवले. व एकूणच ह्या दोन्हींचा एकत्र काही उपयोग केला जाऊ शकतो का हा विचार माझ्या मनात डोकाऊन गेला. दोन्हीं चा समन्वय साधुन दोन्हींच्या आयुष्याकडे पाहाण्याच्या दृष्टीकोनाचा संयोग केला असता. त्यातून जिवन सार्थक बनवण्यास व सुसह्य बनविण्यास नक्कीच होऊ शकेल असे मला वाटले.
अध्यात्म ही ज्ञानशाखा प्रामुख्याने दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करते, ईश्वराचे/विश्वाच्या मुळ कारणाचे ज्ञान व आत्मोन्नती(मुक्ती, सर्वज्ञता, भौतिकतेच्या पलिकडे नेणारे, इ.) आणि ह्या दोन बाबीं मुलत: दोन भिन्न नसून एकाच मार्गात येणारी दोन स्थळे आहेत. ईश्वराचे ज्ञान मिळविण्यासाठी ज्या मार्गावरुन आपण मार्गोत्क्रमण करतो त्या मार्गावर आत्मोन्नती हे स्थळ आहे. व नेमका येथेच अध्यात्माचा ज्योतिष शास्त्राशी संबंध जुळतो. ज्योतिष हे जिवनाच्या भुत-वर्त-भविष्य ह्या अंगांवर दृष्टीक्षेप टाकण्याचे सामर्थ्य आपणांस देते. व जिवनात असलेल्या सर्व भौतिक-अधिभौतिक घटनांचा साक्षीभावाने विचार करण्यास आपल्याला भाग पाडते.
ही साक्षीभावाची संकल्पना श्री जे. कृष्णमुर्ति ह्यांनी फ़ार सुंदर रीतीने सांगितली आहे. आपण आपल्या जिवनाकडे जर स्वत:पासून वेगळे होऊन नि:पक्षपातीपणे पाहिले तर मानवी जिवनाच्या अनेक रहस्यांना उजेडात आणणे आपल्याला शक्य होते. व ह्याच प्रक्रियेमध्ये आपल्याला ज्योतिष मदत करते. ज्योतिषाच्या साहाय्यने आपल्याला आयुष्याचे असंख्य पाकळ्यांचे फ़ुल अलगद फ़ुलतना पाहाता येते व आपल्याला प्रत्येक पाकळी स्वतंत्र ही पाहाता येते.
हा पण येथे ज्योतिष आपण ज्या पारंपारिक(?) पध्दतीने विचारात घेतो ती येथे खचितच उपयोगाची नाही. ज्योतिष ही एक ज्ञानशाखा जी ग्रहांच्या स्थितीचा आणि जिवनाच्या घटनांचा विचार एकाच दिशेने जाणार्या समांतर प्रकाश किरणांसारखा करते. आणि आपल्याला एका प्रकाश किरणाबद्दल गणिताच्या साथीने त्याच्या स्थितीबद्दल निश्चित सांगता येते व दुसर्या बद्दल नाही. पण ते एकाच गतिने जात असल्याने व ते एकमेकांस समांतर असल्याने. एकाच्या स्थितीवरुन आपण दुसर्याच्या स्थितीबद्दल अंदाज करु शकतो.
हाच विचार ज्योतिष्यात ग्रह व जिवनांतील घटनांबद्दल केला जातो. घटनांबद्दल भाकित करता येत नाही. पण ग्रहांची स्थिती गणिताच्या आधाराने सांगता येते. जेणे करुन आपण ग्रहांच्या स्थितीवरुन आयुष्यातील घटनांचा अंदाज बांधतो. ह्यात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, कोणीही कोणावरही कसलाही परिणाम करित नाही, किंवा कोणीही कोणाचे छद्मरुप ही घेत नाही. ह्या दोन प्रक्रिया एकमेकांस समांतर चालतात. आणि हीच एक बाब आहे जी आपल्याला ज्योतिष शास्त्राचा वापर करता येण्याच्या मागे आहे. आपल्या पुर्वजांनी मानवी जिवनाशी समांतर अश्या अनेक निसर्गातील चक्रांचा जिवनाबाबत भाकिते करण्यास वापर केलेला आहे. त्यात प्रामुख्याने आपली ओळखी ग्रहज्योतिष्याशी आहे.
मग ह्यातून काही मुलभुत बाबीं समोर येतात. त्या म्हणजे जिवनाची पुर्वनिश्वितता, व आपल्या प्रयत्नवादास असलेल्या मर्यादा. आणि ह्या दोन बाबीं जर आपण स्विकारल्या तर आपल्या जिवनांतील बहुतांश भौतिक समस्या अदृश्य होतात. व आत्मोन्नतीचा मार्ग सुकर होतो.
हा पण ह्याचा अर्थ असा नक्कीच नाही की, आपण दैववादी बनावे. पण ह्या दोन शास्त्रांतील असे कोणते गुण आहेत ज्यांचा प्रयत्नवादा बरोबर धनात्मक बाजूने विचार करता येईल. हा विचार केल्यास माझे उपरोक्त लिखाण आपल्याला रुचेल. विस्तारभयास्तव ह्या लेखाचा काहीच भाग येथे देत आहे.

Thursday, January 21, 2010

New Way

बैसलो वृक्ष सान्निध्यी, विद्येचिया माहेरी,
स्वजीवनी मन मम, सचिंत आहे.

झाहलो कृत निश्चयी, आपुलेचीया ठायी,
स्वगतासी मम, साक्षीभावे पाहे.

पातले किती अनेक, ध्येयमार्गासी शुल,
निर्दालीन ते मीच, होऊनी चक्रपाणी.

द्रव हे हृदय, करुनी आज दृढ,
माझे हेच रुढ, देतो हीच वाणी.

समांतरीचे जिवन, होते ते द्वीमार्गी,
अंती मी एकच, आज आक्रमीत आहे.
___सुरेश खोले.

Friday, October 16, 2009

ओळख शतकत्रयाची

ओळख शतकत्रयाची
दिक्कालाद्यनवच्छिन्नानन्तचिन्मात्रमूर्तये ।
स्वानुभूत्येकसाराय नम: शान्ताय तेजसे ॥

जो दिशा, भूत, भविष्य, वर्तमानकाल यांहींकरुन परिच्छेदरहीत म्हणजे अमक्या प्रदेशात अमूक काली होता. आहे किंवा असेल. असा व्यवहार ज्याचे ठायी संभवत नाही. निरवधी ज्ञान हेच आहे. स्वरुप ज्याचे, आणि स्वकीय अनुभवच आहे मुख्य तत्व ज्याचे असा जो शांत तेजोरुपी परमेश्वर त्यास नमस्कार.

आपल्या प्राचिन संस्कृत साहित्यातील हा ही एक भाग. हि शतकत्रयी राजा भर्तृहरी ह्यानी रचली आहे असे मानले जाते. जर्मन विद्वान श्री मेक्स मुल्लर यांनी ह्या राजाचा कालावधी इ.स.६५० च्या आसपास असे मानले जाते. ह्याचे वाक्यप्रदीप व महाभाष्य टिका नावाचे आणखी काही ग्रंथ आहेत पण प्रसिध्द शतकत्रयीच आहे. ह्या शतक त्रयी मध्ये नावाप्रमाणेच तीन भाग आहेत. ह्यामध्ये नीती, शृंगार, वैराग्य अशी तीन शतके आहेत. प्रत्येकी शंभराच्या आसपास श्लोक आहेत. काही शतकात जसे की नीतीशतकात ११७ श्लोक आहेत. व श्रृंगार शतकात १०७ आहेत. ही शतके राजा भर्तृहरी याने आपल्या तारुण्यात श्रृंगार शतक, मध्यम वयात नीतीशतक तसेच उतार वयात वैराग्य शतक रचले असावे असे मानले जाते. संस्कृत काव्यामध्ये कालीदासानंतर राजा भर्तृहरीच जास्त प्रसिध्द मानला जातो.
व नंतर श्री वामन पंडीतांनी त्यावर आपले प्राकृत काव्य रचले आहे. ते अत्यंत संस्कृत श्लोकांच्या अर्थाला धरुन रचलेले आहे. ह्या शतकांची भाषा ऒघवती, प्रसन्न, अर्थगंभीर, सुगम, त्या भाषेत प्रसाद असून ओघ आहे शैली अकृत्रीम आहे. ह्यातील नीतीशतकातील श्लोक कायम सुभाषीत म्हणूनच वापरले जातात. नीतीशतकातील सुभाषीते म्हणजे संसारातील जीवनपथ दर्शक दीपगृहेच मानली जातात.
सिंह:शिशूरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु ।
प्रकृतिरियं सत्ववतां न खलू वयस्तेजसो हेतू: ॥
सिंह हा बाल्यावस्थेत असतानाही मदस्त्रावाने मलिन आहेत गंडस्थळे ज्यांची अशा मदोन्मत्त हत्तीवर उडी घालीतो. त्याचप्रमणे पराक्रमी जो आहे तो जन्मस्वभावानेच असतो त्यांच्या तेजास वयाचे बंधन नसते.

दौर्मन्त्र्यान्नृपतिर्विनश्यति यति: संगात्सुतो लालना ।
द्विप्रोनध्ययनात्कुलं कुतनयाच्छीलं खलोपासनात ॥
ह्रीर्मद्यादनवेक्षणादपि कृषि: स्नेह: प्रवासाश्रया ।
न्मैत्री चाप्रणयात्समृध्दिरनयात्यागात्प्रमादाध्दनम ॥

राजा वाईट प्राधानामुळे, साधू विषयलोभाने, मुलगा लाडाने, ब्राह्मण अध्ययन न केल्याने, कुळ वाईट पुत्राने, सत्स्वभाव नीच सेवेने, लज्जा मद्यपानाने, शेत न पाहिल्याने, स्नेह प्रवासाने, मैत्री प्रेम न केल्याने, ऎश्वर्य अन्यायाने, धन अव्हेर केल्याने याप्रकारे ह्या बाबीं नाश पावतात.
ह्यात आपण तीन्हीं शतकांचा क्रमाने परिचय करुन घेऊ.

नीतीशतक :
नीतीशतकाचे १०-१० श्लोकांचे भाग पाडले जातात. ह्या भागांमध्ये जीवनात वागण्याबाबतचे अत्यावश्यक असे तत्वज्ञान सापडते . ते निम्नानुसार, अज्ञपध्दती,विद्वत पध्दती, मान-शौर्य पध्दती, अर्थ पध्दती, दुर्जन, सुजन, परोपकार, धैर्य, दैव, कर्म अशी वर्गवारी नीतीशतकाची केलेली आहे.

श्रृंगारशतक :
ह्या शतकांत हे तारुण्यात रचलेले असल्याने तारुण्यसुलभ अश्या शृंगारीकतेने नटलेले आहे. ह्या शतकाचे साधारणत: ५ भाग कल्पिता येतात.
पहिल्या २० श्लोकांत स्त्रियांचे सौंदर्य, त्यांची मनोहर कांती, नम्रता, वगैरे गुणांची प्रशंसा केली आहे. सौंदर्य प्रसाधने वापरुन सौंदर्यात वाढ केली जाते हे ही सांगितले आहे. पुढील विस श्लोकांत रतिक्रिडेत स्त्रियांचे चातुर्य कसे दिसते हे दाखवले आहे. ह्या शतकाच्या शेवटच्या भागात मदनाच्या कामबाणांनी पराभूत झालेले साधू, संत इ. कसे वैराग्यास कारणीभूत होतात हे सांगितले आहे.

वैराग्यशतक :
हाव कशी वाईट आहे, याचक वृत्तीचा धिक्कार, योग > संयम > ब्रह्मसाक्षाक्तार यांचा पुरस्कार. नित्य आणि शाश्वत वस्तू कश्या ओळखायच्या हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे असे ह्या शतकांत सांगितले आहे. ह्याचा शेवट संयमीत जीवनात म्हणजे अवधूत जीवनाचे वर्णन ह्यात आहे.

राशी भविष्य. ओक्टो १५ ते नोव्हें १५ २००९

मेष :- शिक्षण क्षेत्रात ह्या महिन्यात मोठ्या घडामोडी होतील. काही अचानक निर्णय घेतले जातील. आपल्या धनार्जनाच्या मार्गांमध्ये ही ह्या महिन्यात मोठा बदल दिसतो आहे. मार्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. धार्मिक क्षेत्रांना भेटीगाठीचे प्रसंग येतील. मित्र मंडळीमध्ये वयाने मॊठ्या असलेल्या मित्रांचे मार्गदर्शन ह्या महिन्यात महत्वाचे आहे.
वृषभ :- लहान भावंडाकडून आपल्याला ह्या महिन्यात त्रास होण्याची शक्यता आहे. मानसिक तयारी ठेवावी. संततीच्या बाबतीत काही नवीन बाबिं कळतील. कला बहरेल. नोकरीच्या जागी अधिकारी जागांचा उपयोग करुन घेता येईल. वरिष्ठांकडून मोठ्याप्रमाणात लाभ होतील.
मिथुन :- रोख रकमांबाबतचे ह्या महिन्यात काही अचानक निर्णय घेतले जाऊन पुढील गोंधळास कारणीभूत ठरतील त्याचा विचार करावा. घर, वाहन ह्या संदर्भात आपण काही बहु परिणामकारक निर्णय घ्याल. वैवाहिक जोडीदार ह्या महिन्यात विचित्र वागेल. वाहनांसंदर्भात काही कागदपत्रे सांभाळून ठेवावीत.
कर्क :- आपल्या स्वभावात ह्या महिन्यात थोडासा तुसडेपणा येण्याची शक्यता आहे. रोख रकमांचे व्यवहार अगदी सुरळीत होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. वैवाहिक जोडीदार ह्या महिन्यात दृष्टेपणाने वागेल त्यासाठी आपण त्यांचे ऎकावे. हाडांचे विकार जोर धरतील. भावंडांकडुन होणारे गैरसमज टाळावेत.
सिंह :- आपला स्वभाव ह्या महिन्यात जरासा शांत होईल. त्यामुळे कुटूंबातील बरेच आवाज ह्या महिन्यात डोकेवर काढतील. धनार्जनाच्या मार्गात वाढ होईल. अनेक व्यवसायांचा सहभाग होईल. अचानक काही वस्तु सापडतील व आपल्याला आश्चर्य होईल. डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.
कन्या :- आपला द्वीधा असलेला स्वभाव हा महिना ह्या महिन्यात अजुनच गोंधळाचा होणार आहे त्यासाठी आपण गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मुलांकडुन आपल्याला महत्वाचे सल्ले मिळतील त्यांचा वापर करावा. मित्रांकडून कटू भाषाण ऎकून घ्यावे लागेल त्याचाही उपयोग होईल.
तुळ :- घरासंदर्भात, वाहनासंदर्भात महत्वाचे बदल होतील त्यांसाठी तयार राहा. मुलांकडून कलाविष्कार पाहावयास मिळतील.
कामाच्या ठिकाणासंदर्भात आधिकारी व्यक्तिकडून आपल्याला काही निर्णायक बाबीं ऎकाव्या लागतील. मित्रांबरोबर मजेत दिबस जातील. आपल्याकडून ह्या महिन्यात मोठे खर्च अनेक बाबींवर होतील.
वृश्चिक :- लहान भावंडांकडून आपल्याला काही महत्बाचे निर्णय दिले जातील. आपल्या धार्मिक गुरु कडून आपल्या काही पारमार्थिक गोष्टींचे आयुष्याला खुप महत्वाचे ज्ञान दिले जाईल. मित्रांबरोबर प्रवासाला जाल.आपल्या कामाच्या आधिकारी व्यक्तिंकडून खुप काळापासून अडकलेले काम पुर्ण होईल.
धनु :- आपला स्वभाव ह्या महिन्यात पुर्णपणे स्फ़ोटक बनेल. कुटूंबातील मोठ्या अधिकारी व्यक्तिंकडून आपल्या आयुष्यात केलेला हस्तक्षेप वाढेल. त्याचे कारण गुढ राहिले. आपल्याकडून महत्वाची अवजारे, चाव्या इ. हरविण्याची शक्यता आहे. स्त्री गुरु, मार्गदर्शकांकडून महत्वाचे मार्गदर्शन होईल. कामाच्या ठिकाणी कागदपत्रांसंबंधी काही कामे पुर्ण होतील.
मकर :- आपल्या स्वभावात कधीही नसलेला सम्यक विचारांचा पाया ह्या महिन्यात दिसून येईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराकडून ह्या महिन्यात विचित्र मते मांडलेली दिसतील. त्याचा अर्थ लागणार नाही. आपल्या कडून जवळच्या स्त्री नातेवाईकांच्या वस्तू हरविण्याची शक्यता आहे.
कुंभ :- आपला स्वभाव ह्या महिन्यात गुढ बनेल. धनार्जनाचे मार्ग ह्या महिन्यात टोकाची भुमिका घ्यावयास लावतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर दिवस मजेत जातील. मैत्रांबरोबरचा काळ आपण आपल्यासाठी महत्वाचा आहे गैरसमज टाळावेत.
मिन :- आपली मुले ह्या महिन्यात वादग्रस्थ भुमिका घेताना दिसतील. धनार्जन उत्तम राहिल. वैवाहिक जोडीदारासंदर्भात काही गॊधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सल्ले ह्या महिन्यात आपल्याला लाभदायक ठरतील. आपल्या लांबच्या नातेवाईकांकडुन आपल्याला ह्या महिन्यात आर्थिक फ़ायदे होतील.
शुभं भवतू !!!

आपला वारसा...सहदेव भाडळी

प्राचिन भारतीय विद्यांपैकी सर्वांनाच भुरळ पाडणारी एक विद्या म्हणजे ज्योतिष ही होय. आपल्याकडे ज्योतिष्यावर प्रचंड मोठे संशोधन झाले. परदेशी काही ज्योतिष प्रकारांचे जतन संबंर्धनही आपल्या पुर्वजांनी केले. आज त्याचे स्बरुप जरी व्यावसायीक झालेले असले तरीही, ज्योतिष्याचे आपल्या प्राचिन संस्कृतितले स्थान तसे अबाधितच म्हणावे लागेल.
आपल्या जातीव्यवस्थेच्या पगड्यामुळे ज्योतिष ही कोणे एकेकाळी उच्चजातीयांची मक्तेदारी होती. पण ह्या मक्तेदारीला शह देण्याचे अनेक प्रयत्न झाले त्यातला एक प्रयत्न म्हणजे सहदेव भाडळी हा होय.
सातशे वर्षांपुर्वी मार्तंड जोशी नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेली दोन मुले म्हणजे सहदेव-भाडळी ही होय. त्यातील सहदेव हा ब्राह्मण स्त्रीपासून तर भाडळी ही अंत्य जातीतील स्त्रीपासून झालेली मुलगी होय. तीने वडीलांकडचे ज्योतिष शास्त्राचे ज्ञान आत्मसात केले व ते नंतर सहदेवाला शिकविले. ह्याबाबत एक कथा प्रसिध्द आहे की सहदेवाने एका आध्यात्मिक उन्नतांची एक कवटी आणली होती व तो उगाळून पित होता व ती कवटी भाडळी ने ती चोरुन कुटून पिठ करुन पिऊन टाकली व तीला ज्योतिष्याचे ज्ञान प्राप्त झाले. परंतू तिच्या रचनांवरुन ही घटना सत्य असल्याचे पुरावे मिळत नाहीत. तिच्या रचनांमध्ये अनेक समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये व आधीच्या ग्रंथामध्ये प्रगट झालेले विचार आपल्याला दिसतात. तिने केलेल्या रचनेवर तिच्या सामाजिक स्थानाचा परिणाम झालेला दिसून येतो. तिचे ज्ञान हे नंतर ''सहदेव-भाडळी'' ह्या नावानेच प्रसिध्द झाले आहे. तिच्या ज्ञानाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पुन्हा तिला जातीच्या उतरंडीची मदत घ्यावीच लागली.
तिने 'मेघमाला' नावाचा श्री व्यासांनी लिहीलेला ग्रंथ प्राकृतात आणला. व पर्जन्य विचारांवर स्वत:चे असे काही विचारही मांडलेले दिसतात. तिने पर्जन्याचा विचार करताना ज्योतिष शास्त्रापेक्षा हवामान शास्त्राचा विचार जास्त केलेला दिसतो. शकून संदर्भात असलेले तिचे विचार हे रोजच्या जिवनातून ज्योतिष शास्त्राचा उपयोग कसा करावा हे प्रथमत: सांगताना आपल्या भाडळी दिसते.
श्री शाहिर हैबती घाडगे (१७९३-????) ह्यांनी तिच्या ज्ञानाचा अभ्यास केला व त्यांबर आपल्या लावण्यांमधे रचना केली. आज भाडळीचे आपल्याला उपलब्ध असलेले ज्ञान हे श्री हैवतींची देण आहे. नाहीतर आपल्या जात्यंध समाजात व काळाच्या ऒघात ते ज्ञान नाश पावले असते.
भाडळीच्या ह्या रचनांमध्ये आपल्याला तत्कालिन समाजास आधुनिक वाटणारे अनेक विषय तिने हाताळलेले दिसतात. त्यांत गांधर्व विवाह, शल्यचिकित्सा, आयविचार, पिकांवरील रोग व त्यांवरील उपचार, आरोग्य व ज्योतिष, पर्जन्याचे हवामान शास्त्राने केलेले विबेचन, स्त्री-प्रशंसा इ. अशी ही भाडळी ज्ञाननिर्मिती करुनही कवटी चोरण्याच्या आरोपाने धुर्त अशी मंडीत केली जाते...
आपल्या जुन्या मराठी ज्ञाननिर्मितीकारांमध्ये हे ही एक रत्न आपल्याला जोडता येते...

Sunday, July 12, 2009

ओळख प्राचिन साहित्याची

भारतीय हिंदू साहित्य हा एक मोठा अनाकलनिय असा ज्ञानसागर आहे ज्यात अनेक भारतीय व परदेशी विद्वानांनी अवागहन केले आहे. त्यातुन असंख्य अशी ज्ञानरत्ने बाहेर काढली आहेत. आपले भारतीय साहित्य हे अनेक ज्ञानशाखां, कला, विद्या यांची खाण आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेखनीय असे आपले वैदीक साहित्य येते ज्यात जगातील सर्व ज्ञानशाखा तर सापडतातच पण ह्या जगाची उत्पत्ती, ईश्वराविषयीचे तत्वज्ञान, व ह्या जगात जगण्याविषय़ीचे व्यावहारिक ज्ञानही मोठ्याप्रमाणात सापडते. अनेक ग्रंथांची नावे व अनेक गोंधळातुन आपल्याला नेमका प्रश्न पडतो की हे नक्की काय आहे ह्या साहित्याची उत्पत्ती व वर्गिकरण कसे केले जाऊ शकते. मलाही असाच विचार पडला व त्यातुन हा लेखन प्रपंच घडला.
आपले प्राचिन साहित्य हे वेद, ब्राह्मणके, अरण्यके, उपनिषदे, वेदांत, जेमिनीय व बादरायण, पुर्व व उत्तर मिमांसा, षडदर्शने, त्यानंतर पुराणे, व महाकाव्ये महाभारत, रामायण इ. हे अंतर्भुत होतात.
आपण नेहमी पुराणातील वांगी पुराणात असे म्हणुन आपण ह्या साहित्याकडे दुलर्क्ष करतो. पण ह्यात जे ज्ञान भरलेले आहे. ते परदेशी विद्वानांनी जास्त ओळखले आहे. व त्यावर संशोधने चालू आहेत. मोठ्याप्रमाणावर ह्या दुलर्क्षाचा आपल्याला तॊटा ह्यामुळे सोसावा लागत आहे. आज जर आपल्याला आपला प्राचिन ग्रंथ व सर्वात महत्वाचा असा 'ऋग्वेद' वाचावयाचा असेल तर तो मॅक्स मुल्लर ह्या जर्मन विद्वानाने संपादित केलेला जर्मनिवरुन मागवावा लागतो. ह्या जर्मन विद्वानाने अनेक संस्कृत ग्रंथांचे जर्मनीमध्ये भाषांतर केले आहे. व इतरही ग्रंथांची हिच अवस्था आहे. कालांतराने श्री स्वामी दयानंद सरस्वतींसारखे आधुनिक ऋषी जन्माला आले व त्यांनी वैदिक साहित्याचे पुर्नज्जिवन केले. आणि वैदीक ज्ञानावर श्री स्वामी विवेकानंद यांनी मोठ्याप्रमाणात काम केले परंतू हे वैदिक ग्रंथ मुळस्वरुपातील खुप कमी प्रमाणात मुद्रीत २करण्यात आले व त्यावर आपले आद्यग्रंथ म्हणुन लोकांचे साहित्यीकांचे लक्षही कमीच राहिले. एकूणच आपल्या प्राचिन ज्ञानाविषयीची आपली अनास्था अजुन बदललेली नाहीये.
व्यावहारिक फ़ायदा नसलेले म्हणुन त्यांची कायमच उपेक्षा होत राहिली आहे, पण जेव्हा ह्या ग्रंथ विस्ताराचा आपण विचार करु तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या प्राचिन साहित्यात आज प्रचलित असलेल्या सर्व विद्या व कलांचा उल्लेख आपल्याला सापडतो.
ह्याबद्दल भृगु संहितेतील एक श्लोक खुप महत्वाचा ठरतो.
यद्यत्स्याद्वाचिकं सम्यक्कर्म विद्येती संज्ञितम शक्तो मूकोपि यत्कर्तु कलासंज्ञं तत्तस्त्मृतम
विद्या त्यनंताश्च कला: संख्यातुं नैव शक्यते विद्या मुख्यातु द्वात्रिंशश्चतु: पाष्टि कला स्मृता (भृगु संहिता)
म्हणजेच एखादे काम कसे करता येते येते ह्याचे विवेचन करता येते तेव्हा त्यांस विद्या (आजच्या भाषेत शास्त्र) व नुसते काम करता येते पण त्याची कारणमिमांसा करिता येत नसल्यास त्यास कला असे म्हणतात. एकूण बत्तीस विद्या व चौसष्ट कला प्रमुख आहेत. ह्यांसर्व विषयावर संपुर्ण प्रकाश टाकणारे एक पुस्तक सध्या उपलब्ध आहे. वरदा प्रकाशन पुणे यांनी ते "प्राचिन हिंदी शिल्पशास्त्र" ह्या नावाने प्रकाशित केले आहे. आणि ह्या कला व विद्यांचे ज्ञाते उद्गाते ह्यांची यादी मानसारम नावाच्या वास्तूशास्त्रावरिल ग्रंथात सापडते.
विश्वकर्मा च विश्वेश: विश्वसारं प्रबोधक: वृतश्चैव मयश्चैव त्वष्टा चैव मनुर्नल:
मानविन्मानकल्पश्च मानसारो बहुश्रुत:प्रष्टा च मानबोधश्च विश्वबोधो नायश्च तथा
आदिसारो विशालाश्च विश्वकाश्यप एव च वास्तुबोधो महातन्त्रो वास्तुविद्यापतिस्तथा
पाराशरीयकश्चैव कालयुपो महाऋषी:चैत्याख: चित्रक: आवर्य साधकसारसंहित:
भानुश्चेंद्रश्च लोकज्ञ: सौराख्य शिल्पिवित्तम: तदेव ऋषय: प्रोक्ता द्वात्रिंशति संख्यया
(मानसारम अध्याय ६८, श्लोक ५ ते ९)
म्हणजेच विश्वकर्मा, विश्वे, विश्वसार, प्रबोधक, वृत्त, मय, त्वष्टा, मनु, नल, मानविन, मानकल्प, मानसार, प्रष्टा, मानबोध, विश्वबोध, नय, आदिसार, विशाल, विश्वकाश्यप, वास्तुबोध, महातन्त्र, वास्तुविद्यापति, पाराशरीयक, कालयुप, चैत्य, चित्रक, आवर्य, साधकसार, भानु, इंद्र, लोकज्ञ, सौर, असे एकूण ३२ ऋषी शिल्प म्हणजेच वेगवेगळ्या शास्त्रांचे ज्ञाते म्हणुन ऒळखले जातात. ह्यांपैकी काही जणांचे साहित्य आज उपलब्ध आहे.
अजुन अनेक दाखले दिले जाऊ शकतात ज्यात आपल्या प्राचिन कला व त्यांचा विस्तार दिला आहे.
अश्याप्रकारे व्यावहारिक उपयोगाचेही ज्ञान आपल्या प्राचिन ग्रंथामध्ये होते हे आपल्याला मान्य करावे लागते. आज काहीप्रमाणात का होईना वास्तुशास्त्राचे पुर्नज्जिवन चालू आहे. व त्यासंबंधीत प्राचिन संस्कृत ग्रंथांचे संशोधन, पुर्नमुद्रण, जतन करण्याचे कार्य चालू आहे.
विस्तार भयास्तव आपण हा विषय येथेच ठेऊन मुळ विषयाकडे वळू.
अनेक इतिहास तज्ञ जसे सांगतात त्याप्रमाणे आर्य जे मध्य पुर्वेमधुन संपुर्ण जगामध्ये स्थायिक जाहले. ते सात भागांमध्ये वर्गिकृत केले जातात. हिंदू, पार्शियन, ग्रिक, रोमन, सेल्ट्स, टुटॉन्स, आणि स्लेव्स, ह्यांच्याबद्दल मनूस्मृतीमध्ये उल्लेख सापडतात.
दोन मोठ्या पर्वतांमधील भुमी जी आर्यवर्त म्हणुन ओळखली जाते . आर्य म्हणजेच उत्तम, सर्वश्रेष्ठ असा होय व त्या लोकांची भुमी म्हणजेच आर्यावर्त होय़. हे आर्य २५०० ई.स. पुर्व दरम्यान भारतात स्थायिक झाले असे समजले जाते. तेथे सिंधू, गंगासारख्या नद्यांच्या काठावर त्यांनी वसत्या स्थापन केल्या. भारतीय इतिहासाची सुरुवात होते तीच मुळात आर्य व स्थायिक लोकांच्या युध्दांपासुन. हे आर्य जे उंच व देखणे, गोरे असे जसे की आजचे सिंधी लोक, उत्तर भारतात प्रवेश करते झाले व पुढे. त्यांनी संपुर्ण भारतात आपले बस्तान बसविले. ह्याच लोकांनी येथे आल्यावर ऋग्वेदाची निर्मिती केली असे समजले जाते. मुलत: जरी वेद हे अपौरुषेय समजले जात असले तरी त्यांची निर्मिती. ह्या आर्यांच्या काळात झाली आहे. प्रथम ऋग, नंतर गायनात असलेले मंत्र म्हणजेच सामवेद व त्यानंतर अथर्व व शेवटी काळे व गोरे यांनी मिळुन म्हणजेच आर्य व आर्यतर स्थानिक यांनी मिळून बनलेला हा यजुर्वेद होय. ह्या वेदांच्या निर्मिती नंतर त्या वेदांचे अर्थ व स्पष्टीकरणे आपापल्या मतानुसार मांडण्याची परंपरा निर्माण झाली त्यातुन प्रथम उच्च विद्वान ब्राह्मणांनी रचल्याने ब्राह्मणके अशी संज्ञा प्राप्त झाली. त्यालाच आपण ब्रांह्मणांनी सांगितलेले असे मराठीत म्हणू शकतो. नंतर अरण्यात राहाणार्या ऋषींनी लिहिलेली अरण्यके. यानंतर उपनिषदे रचली गेली उपनिषदे म्हणजेच अक्षरश: योग्य अश्या वातावरणात वेदातील सुत्रांचे चिंतन करणे असा होय मुख्यत: ही प्रश्नोत्तर स्वरुपात आहेत. शिष्य वा मुमुक्षु प्रश्न विचारतात गुरु अथवा अध्यात्मिक उन्नत प्रश्नांची उत्तरे देतात अशी ह्या उपनिषदांची रचना आहे. याच पध्दतीने नंतरच्या काळात काही उपनिषदांची रचना झाली जी वैदीक साहित्याशी संबंधीत नव्हती जसे की अकबराच्या काळात रचले गेलेले अल्लोपनिषद जे ऋग्वेदाचा भाग असल्याचे सांगितले जाते. किंवा वास्तुशास्त्रोपनिषद नावाचा संस्कृत ग्रंथ जो मुलत: उपनिषद नाही.
ह्या नंतर उपनिषदांतील आत्मा, निर्मिक, विश्वनिर्मिती त्याचे चलन वलन, आणि मन आणि पदार्थांचे आपापसात असलेले नाते समजावणारे तत्वज्ञान हे वेदांताचे मुळ आहे. उपनिषदांनंतर पुर्व मिमांसा व उत्तर मिमांसा असे दोन वेदांताचे भाग निर्माण झाले. ज्यापैंकी उत्तर मिमांसा जास्त प्रसिध्द झाला. कर्म धर्म सिध्दांत हा ह्या तत्वज्ञानाचा मुख्य भाग समजला जातो.
मागच्या जन्मात केलेल्या कर्मामुळॆ पुर्नजन्म येतो. त्या जन्मात इच्छा (षडरिपु) त्या मानवाचा ताबा घेतात. व त्यांतुन पुन्हा पुर्नजन्म प्राप्त होतो. व हे दुष्ट चक्र चालुच राहाते.
व ह्या नंतर तत्वज्ञानाचा उच्चांक गाठणार्या सहा दर्शनांची निर्मिती झाली. ह्यामध्ये व समकालिन ग्रिकांच्या तत्वज्ञानात साम्य आढळते.
श्री सर मोनियर विल्यम्स आपल्या ग्रंथात म्हणतात की,
''Indeed, if I may be allowed the anachronism, the Hindus were Spinozites more than two thosand years before Spinoza, Darwinians many centuries before Darwin, and Evolutionists many centuries before any word like evolution existed in any language in the world.''(Brahmanism and Hinduism)
सांख्य तत्वज्ञान हे सर्वात जुने असे तत्वज्ञान आहे. हे कपिल ऋषींनी निर्माण केले. हे त्यांचे दर्शन म्हणजेच सांख्य तत्वज्ञान हे आधुनिक बुध्दीप्रामाण्यवादच आहे. त्यांनी आत्तापर्यंत चालत आलेल्या विश्वनिर्मितीच्या सर्व सिध्दांताना बाजूला सारले. त्यांच्याकाळापर्यंत जे ईश्वराचे स्वरुप एकेश्वरापासून जे त्रिदेवांच्या आराधने पर्यंत आले होते व पुढे ते अनेकदेवत्वात परिणीत झाले. त्याचा धिक्कार केला आहे. सांख्य मतानुसार हे विश्व हे त्याच्या नैसर्गिक गुणांमुळे स्वत:च निर्माण झालेले आहे. व सर्व सजिवांच्या भावना, संवेदना ह्या त्यांच्या शरिराच्या यांत्रीक प्रक्रीयांमुळे निर्माण होतात.
पाश्चात्य विद्वान प्रा.ई.डब्लु. होपकिन्स म्हणतात की ग्रिक तत्वज्ञ प्लेटो ह्याने भारतीय सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. कारण पुढे निर्माण झालेल्या प्लेटोच्या तत्वज्ञानाच्या अनेक उपशाखांमध्ये सांख्यमताचे अवषेश सापडतात.
पतंजलींचे योगीक तत्वज्ञान हे इतर काही नसून अधिभौतिक सांख्य तत्वज्ञान आहे. त्यात त्यांनी हे तत्वज्ञान मनोकायीक व्यायामाशी जोडले आहे. पतंजलींच्या मतानुसार आपण जर आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवून आपले मन विशिष्ट बाबींवर केंद्रित केले तर आपण अनेक सिध्दींचे मालक बनतो.
ह्यानंतर येतात ती अठरा पुराणे, ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव/वायु, श्रीमद्भागवत, देवीभाद्भवत, नारद, मार्कण्डेय, अग्नेय, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वाराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्माण्ड, ही अठरा पुराणे होते याशिवाय अनेक उपपुराणे आहेत. ह्यातील साम्यत्वाचा एकच मुद्दा म्हणजे ह्यात उल्लेखलेला प्रत्येक देव हा त्या त्या पुराणानुसार सुष्टीकर्ता आहे. किंवा अनेक बुध्दीला न पटणार्या कथांनी ही पुराणे भरलेली आहेत. परंतू त्याच प्रमाणात विचार करायला लावणारे अनेक मुद्दे त्यांत आहेत. नारद पुराणांमध्ये अनेक मोठमोठी अवकाशीय गणिती सुत्रे आहेत. गरुड पुराणांत रत्नशास्त्रावर विस्तृत विवेचन आहे. जवळ जवळ प्रत्येक पुराणांत आपल्या देशांच्या व आसपासच्या बहुतांश देशांच्या भुगोलाबद्दल प्रचंड माहिती आहे. एकूण ही पुराणे गोष्टीरुप असलेली विश्वकोष आहेत. ज्यात प्रचंड माहितीचा सागर आहे. फ़क्त बुद्धीला न पटणार्या कथांमुळे आपण त्यांपासुन दुर आहोत. त्या कथांना सध्या बाजुला ठेऊन आपण त्यातील ज्ञानाचा वापर करुन घ्यावा असे मला वाटते.
अश्याप्रकारे वैदीक साहित्य प्रचंड तत्वज्ञान, व्यावहारिक ज्ञान, कला ह्या माहितीने भरलेले आहे. अनेक विषयानुसार आपण त्याचा परामर्श आपण क्रमश: घेतच राहु. तोपर्यंत आपल्यातील निर्मिकास माझे अनंत नमस्कार,
सुरेश चं खोले (BA, Dip In Vastushastra)