Sunday, July 12, 2009

१ जुलै २००९ ते १ औगस्ट २००९

मेष :- आपला भडकू स्वभाव पहिल्या आठवड्यात प्रकर्षाने दिसुन येईल. अनेकदा मिष्टान्नाचा लाभ होईल. अधिकारीपदावरुन बोलताना गोंधळ टाळा. भावंडांना योग्य सल्ले द्याल. इतरांचे वाहनादी वस्तु आपल्या वापरास येतील. मुले कामात उशीर करतील. प्रेम प्रकरणे भेटी गाठी होतील. कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या जबाबदार्या एकाच वेळी पार पाडाव्या लागतील. गुरु कडुन व अज्ञात व्यक्तिकडुन आपल्याला मार्गदर्शन मिळेल. दुसर्या आठवड्यात कुटुंबात प्रिय व्यक्तिचे आगमन होईल. धार्मिक बाबतीत काही कार्ये आपल्याकडून केली जातील.तिसर्या आठवड्यात घर, वाहन यांचे सौख्य मिळेल. प्रेम प्रकरण, इत्यादींची सुरुवात ह्या आठवड्यात करुन नका. काही वस्तु अचानक हरविण्याची शक्यता आहे. चवथ्या आठवड्यात आर्थिक लाभाकडे आपले अनावश्यक जास्त लक्ष जाईल त्यास आवर घाला.
वृषभ :- या महिन्यात आपल्याकडे लोकांचे लक्ष जास्त राहिल. रोख व्यवहार करताना काळजी घ्या. भावंडांना कारण नसताना मदत करावी लागेल. घर वाहन ह्यासाठी खर्च करावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीला आईचे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शेयर्स, गेम्बलींग ह्याद्वारे धनलाभ होतील. अधिकारीपदे भोगण्यास मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मोठ्याप्रमाणावर मार्गदर्शन लाभेल. मित्रमंडळातील एखाद्या विचित्र वागण्यामुळे त्रास सहन करावा लागेल. वाहने यंत्रसामुग्री चालवताना सावध राहा. दुसर्या आठवड्यात जुने काही छंद जोपासण्यास पुन्हा सुरुवात होईल. पगारवाढ बढती इ होण्याचे योग आहेत.
तिसर्या आठवड्यात गेलेल्या काही वस्तु परत मिळतील. उसने पैसे वसुल होतील. विचार धार्मिक राहातिल.
मिथुन :इतर लोकांवर अधिकार गाजवाल. घरामध्ये अनपेक्षीतपणे पाहुणे येतील व कदाचित त्यांच्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागेल. लहान भावंडाकडुन होणारी आपली कामे उशीरा होतील. आपल्या गोंधळी वागणुकीवर लक्ष द्या व ती कमी करण्याचा प्रयत्न करा. मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कला, होटेलिंग, इ करमणुकीवर खर्च होईल. सासरकडच्या एखाद्या माणसाकडुन थोडासा त्रास सहन करावा लागेल. गुरु कडुन व अज्ञात व्यक्तिकडुन आपल्याला अध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या अधिकारी व्यक्तिकडुन त्रास सहन करावा लागेल. वैवाहिक जोडिदाराकडुन अचानक लाभ होतील. एखादे surprize gift मिळेल. मित्र मंडळीशी वादाचे प्रसंग येतील. तंत्रशास्त्रातील एखादा उन्नत व्यक्ति आपल्याला महत्वाचे सल्ले देईल.
कर्क :- आपला स्वभाव ह्या महिन्यात थोडासा इतर लोकांना त्रासदायक ठरेल. तरी त्याची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तिंकडुन कामे होण्याची अपेक्षा ठेऊ नका. रोखीचे व्यवहार संथ गतीने होतील. मातृसौख्य लाभेल. अचानक धनलाभ होतील. वैवाहिक जोडीदाराकडुन विचित्र वागणुकीस सामोरे जावे लागेल. काही अधिकारासंबंधी कागदपत्रे, महत्वाच्या वस्तु या गहाळ होऊ शकतात त्यांची काळजी घेणे आवश्यक. धार्मिक बाबतीत काही नवीन चर्चा होतील त्यातुन आपले जुने संदर्भ बदलवणारी सत्ये समोर येतील. कामाच्या ठिकाणी बरोबरच्या लोकांशी वादाचे प्रसंग येतील ते टाळण्याचा प्रयत्न करा. मित्र मंडळात काही नविन चांगले मित्र बनतील. दुसर्यास द्यावयाच्या काही पैसे, वस्तु, इ बाबत सतर्क राहा त्यात गोंधळ होण्याची शक्यता आहे. २/३ आठवड्यात धार्मिक स्थळांना भेटी देण्याची शक्यता आहे.
सिंह :- आपल्या स्वभावास विरुध्द असा एकदम शांत असा स्वभाव ह्या महिन्यात लोकांच्या अनुभवास येईल. महिन्याच्या सुरुवातीलाच छोटे प्रवास घडतील. मुले व प्रेयसी/प्रियकरांच्या विचित्र वागण्याने त्रास होतील. अनेक मार्गाने धनार्जन होईल. बाकी असलेली येणी ह्या महिन्यात वसुल होतील. वैवाहिक जोडीदाराकडुन महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन मिळेल. काही वेळा आपला जोडीदार विचित्र वाटणारे सल्ले देऊ शकतो परंतु ते अंमलात आणा. गुरु, शिक्षक, मार्गदर्शक यांजकडुन कदाचित आपल्या चुकीबद्दल कटु शब्द ऎकावे लागतील. कामाच्या ठिकाणी आपल्या बरोबर काम करणार्यांपैकी चांगले मित्र मैत्रिणी बनतील. डोकेदुखी, किंवा डोक्यासंबंधीचे आजार थोडासा त्रास देतील. मित्र मैत्रीणींबरोबर थट्टा-मस्करी करण्यात जास्त वेळ जाईल.
कन्या :- ह्या महिन्याच्या सुरुवातीला कुटुंबातील व्यक्तिंबरोबर आपला वेळ मजेत जाईल. घर वाहन यासंबंधी काही अचानक चांगल्या घटना घडतील. प्रियकर/प्रेयसी जरा विक्षिप्त वागू शकतील त्यास तयार राहावे. कामात बरोबर असणार्या माणसांकडुन आपल्याला मार्गदर्श न मिळेल. कामासंबंधी/नोकरीच्या ठिकाणासंबंधी काही गुप्त/अज्ञात बाबींचा उलगडा ह्या महिन्यात होईल. वैवाहिक जोडिदार/व्यावसायिक जोडिदार यांकडुन अचानक काही रहस्यांचा उलगडा होईल. सासरचे लोक कदाचित त्रासदायक ठरतील वादाचे प्रसंग टाळा. महिलांना काही सौंदर्यविषयक महत्वाचे सल्ले मिळतील पुरुषांनाही. अधिकारी व्यक्ति आपल्याला काही कामे/जबाबदार्या देताना गोंधळ करतील त्या जबादार्यां विषयी त्यांच्याशी पुन्हा सल्लामसलत करुन घ्या. मित्रांवर खर्च होईल मित्रांशी बौध्दीक चर्चा होतील. दिर्घकालीन वापराच्या वस्तु ज्या कला क्षेत्राशी व आपल्या छंदाशी संबंधीत आहेत अश्या खरेदी केल्या जातील.
तुळ :- ह्या महिन्याची सुरुवात आपल्यास अतिशय आनंददायी अशी होईल. भावंडाचे वागणे ह्या महिन्यात आपल्या कदाचित त्रासदायक ठरु शकते. आपल्यासाठी इतरांची अनेक वाहने उपलब्ध असतील. मुलांकडुन/प्रिय व्यक्तिकडुन आपल्याला आवश्यक असे मार्गदर्शन मिळेल. ह्या महिन्यात आपले धनार्जन अचानक शेयर्ससारख्या मार्गाने वाढेल. वैवाहिक व व्यावसायिक जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळा. सासरच्या व्यक्तिकडुन आनंददायी अश्या घटना घडतील. धार्मिक अध्यात्मिक बाबींत आपला गोंधळ वाढेल. कामाच्या ठिकाणी HR सारख्या व्यक्तिकडुन आपल्याला त्रास होऊ शकतो. मित्रांकडुन होणार्या कामात विलंब होईल त्याची तयारी ठेवा. भावंडाकडुन धनलाभ होतील. एखादा दुग्धजन्य पदार्थ खाणे आपल्याला ३/४ आठवड्यात खाणे त्रासदायक ठरु शकते ते टाळा. विमा,वारसाहक्काने मिळणारे धन आपल्याला ह्या महिन्यात मिळू शकते.
वृश्चिक :- ह्या महिन्यात आपल्याला अचानक रोख रकमा मिळतील. खर्चिक प्रवृत्तीला आळा घाला. लहान भावंडाशी त्यांच्या नोकरी व्यवसायाबाबत अधांतरी बोलणे टाळा. त्यांना त्याबाबत निश्चित मते द्या. घरात जास्त वेळ जाईल. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तिचे वागणे गुढ राहिल. आपल्या कलेचा अचानक झालेला अविष्कार लोकांना पहावयास मिळेल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदार्या व्यवस्थित पार पाडल्या जातील व त्यातुन आपल्याला शाबासकिची थाप मिळेल. वैवाहिक जोडिदाराबरोबर काळ मजेत जाईल. मणक्यासंदर्भात आजार असतील काळजी घ्या. वडिलांकडुन काही महत्वाचे निर्णय/चर्चा होतील. नोकरीच्या ठिकाणी चालणारी कामे संथ गतीने होतील. आपल्या कलांना ३/४ आठवड्यात बहर येईल. त्याद्वारे धनार्जन होईल.
धनु :- आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाचा आपल्याला व्यावसायिक फ़ायदा ह्या महिन्यात मिळणार आहे. आपल्या बेंकेच्या खात्यावर दुसर्या कोणाचा डोळा आहे हे लक्षात असू द्या. व ते व्यवहार शक्य तेव्हढे गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील वयाने लहान व्यक्तिकडुन आपल्या घर व वैयक्तिक बाबतीत काही महत्वाचे सल्ले मिळतील. राहाते घर व गाडी ह्या दोन्हींही बाबतीत अचानक बदल घडतील. मुलांशी व प्रियकर/प्रेयसी यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी विरुध्दलिंगी मित्रमंडळात आपण चमकाल. पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करित असाल तर कागदपत्रांची देवाण घेवाण करताना सावध रहा. सासरच्या मुख्य व्यक्तिकडुन त्रास सहन करावा लागेल. एखाद्या पारंपारिक अध्यात्मिक गुरुची भेट होईल. मित्रमंडळातील व्यक्तिची अव्याहत अशी साथ मिळेल.
मकर :- महिन्याची सुरुवात आपण आपल्या कामसू स्वभावाने करणार आहात. आपला स्वभाव ह्या महिन्यात लोकांना त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्या. भावंडाशी वादाचे प्रसंग टाळा. स्वयंपाकाशी संबंधीत लोकांनी अग्नि व इतर धारदार वस्तूंपासुन सावध रहावे. आपल्या कला छंद यांना ह्या महिन्यात बहर येईल. आईकडील नातेवाईक यांजकडून आपल्याला त्रास होईल. धनार्जनाचे मार्ग वाढतील. वैवाहिक जोडीदाराकडून मानसिक त्रास दिला जाईल. हाडासंबंधीत विकार असतील तर काळजी घेणे. ३/४ आठवड्यात छोटे प्रवास घडतील. घर वाहन ह्यांद्वारे धनार्जन वाढेल.
कुंभ :- महिन्याची सुरुवात धार्मिक कार्यक्रमांनी होईल. आपण जे निर्णय घेतले आहेत त्यावर ठाम रहा. कुटूंबात वातावरण गरम राहिल. अचानक अनेक रोखीचे व्यवहार होतील. लहान भावंडाशी खेळीमेळीने वागा. ह्या महिन्यात आपल्याला उत्तम वाहनसौख्य मिळेल. आरामदायी गाड्यांमधुन प्रवास होतील. मुले व प्रेयसी प्रियकर याच्याशी बोलताना गैरसमज टाळा. कला क्षेत्राशी संबंधीत माणसांनी आपल्या कलेला मिश्र प्रतिसाद मिळेल हे लक्षात ठेवावे. कामाच्या ठिकाणी मुख्य माणसाकडुन आपल्याला शाबासकी मिळेल. वैवाहिक जोडीदाराकडुन होणार्या कामांना वेळ लागेल हे ध्यानात असू द्या. धार्मिक कार्यक्रम, प्रवास, मार्गदर्शन ह्याद्वारे धनलाभ होईल. परदेशस्थ माणसांसाठी खर्च होतील. मित्रमंडळात जास्त वेळ देऊ नका. महिन्याचा शेवट आपल्याला चलन रुपात (सोने,रोकड, रत्ने,शेयर्स ई.) असणार्या वस्तू मिळून होईल.
मीन :- महिन्याची सुरुवात आपल्या स्वभावाविरुध्द अश्या तापट स्वभावाने होईल. कुटुबातील काही व्यक्तिंमुळे आपण वादात पडाल. लहान बहिणी भेटतील. त्यांच्याबरोबर मजेत काही क्षण व्यतित केले जातील. वाहने व घर या बाबतीत काही गोंधळाच्या घटना घडतील दुसर्याकडुन ह्या बाबीं घेताना विचार करा. मुले/प्रियकर/प्रेयसी यांकडुन काही अवास्तव मागणी केली जाऊ शकते. काही टोकाची मते मांडली जाऊ शकतात. दुसर्यांकडुन येणारे पैशे उशिरा मिळतील. आपली मन:स्थिती थोडी अस्वस्थच राहिल. धार्मिक कर्मांतुन आपल्याला धनार्जन होईल. परदेशस्थ व्यक्तिकडुन मार्गदर्शन मिळेल. आपला ऒढा अध्यात्माकडे राहिल. मित्रमंडळाकडुन त्रास होईल. महिन्याचा उत्तरार्ध आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या नोकरी व्यवसायामधुन होणारे धनार्जन वाढेल.

No comments: