Friday, October 16, 2009

ओळख शतकत्रयाची

ओळख शतकत्रयाची
दिक्कालाद्यनवच्छिन्नानन्तचिन्मात्रमूर्तये ।
स्वानुभूत्येकसाराय नम: शान्ताय तेजसे ॥

जो दिशा, भूत, भविष्य, वर्तमानकाल यांहींकरुन परिच्छेदरहीत म्हणजे अमक्या प्रदेशात अमूक काली होता. आहे किंवा असेल. असा व्यवहार ज्याचे ठायी संभवत नाही. निरवधी ज्ञान हेच आहे. स्वरुप ज्याचे, आणि स्वकीय अनुभवच आहे मुख्य तत्व ज्याचे असा जो शांत तेजोरुपी परमेश्वर त्यास नमस्कार.

आपल्या प्राचिन संस्कृत साहित्यातील हा ही एक भाग. हि शतकत्रयी राजा भर्तृहरी ह्यानी रचली आहे असे मानले जाते. जर्मन विद्वान श्री मेक्स मुल्लर यांनी ह्या राजाचा कालावधी इ.स.६५० च्या आसपास असे मानले जाते. ह्याचे वाक्यप्रदीप व महाभाष्य टिका नावाचे आणखी काही ग्रंथ आहेत पण प्रसिध्द शतकत्रयीच आहे. ह्या शतक त्रयी मध्ये नावाप्रमाणेच तीन भाग आहेत. ह्यामध्ये नीती, शृंगार, वैराग्य अशी तीन शतके आहेत. प्रत्येकी शंभराच्या आसपास श्लोक आहेत. काही शतकात जसे की नीतीशतकात ११७ श्लोक आहेत. व श्रृंगार शतकात १०७ आहेत. ही शतके राजा भर्तृहरी याने आपल्या तारुण्यात श्रृंगार शतक, मध्यम वयात नीतीशतक तसेच उतार वयात वैराग्य शतक रचले असावे असे मानले जाते. संस्कृत काव्यामध्ये कालीदासानंतर राजा भर्तृहरीच जास्त प्रसिध्द मानला जातो.
व नंतर श्री वामन पंडीतांनी त्यावर आपले प्राकृत काव्य रचले आहे. ते अत्यंत संस्कृत श्लोकांच्या अर्थाला धरुन रचलेले आहे. ह्या शतकांची भाषा ऒघवती, प्रसन्न, अर्थगंभीर, सुगम, त्या भाषेत प्रसाद असून ओघ आहे शैली अकृत्रीम आहे. ह्यातील नीतीशतकातील श्लोक कायम सुभाषीत म्हणूनच वापरले जातात. नीतीशतकातील सुभाषीते म्हणजे संसारातील जीवनपथ दर्शक दीपगृहेच मानली जातात.
सिंह:शिशूरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु ।
प्रकृतिरियं सत्ववतां न खलू वयस्तेजसो हेतू: ॥
सिंह हा बाल्यावस्थेत असतानाही मदस्त्रावाने मलिन आहेत गंडस्थळे ज्यांची अशा मदोन्मत्त हत्तीवर उडी घालीतो. त्याचप्रमणे पराक्रमी जो आहे तो जन्मस्वभावानेच असतो त्यांच्या तेजास वयाचे बंधन नसते.

दौर्मन्त्र्यान्नृपतिर्विनश्यति यति: संगात्सुतो लालना ।
द्विप्रोनध्ययनात्कुलं कुतनयाच्छीलं खलोपासनात ॥
ह्रीर्मद्यादनवेक्षणादपि कृषि: स्नेह: प्रवासाश्रया ।
न्मैत्री चाप्रणयात्समृध्दिरनयात्यागात्प्रमादाध्दनम ॥

राजा वाईट प्राधानामुळे, साधू विषयलोभाने, मुलगा लाडाने, ब्राह्मण अध्ययन न केल्याने, कुळ वाईट पुत्राने, सत्स्वभाव नीच सेवेने, लज्जा मद्यपानाने, शेत न पाहिल्याने, स्नेह प्रवासाने, मैत्री प्रेम न केल्याने, ऎश्वर्य अन्यायाने, धन अव्हेर केल्याने याप्रकारे ह्या बाबीं नाश पावतात.
ह्यात आपण तीन्हीं शतकांचा क्रमाने परिचय करुन घेऊ.

नीतीशतक :
नीतीशतकाचे १०-१० श्लोकांचे भाग पाडले जातात. ह्या भागांमध्ये जीवनात वागण्याबाबतचे अत्यावश्यक असे तत्वज्ञान सापडते . ते निम्नानुसार, अज्ञपध्दती,विद्वत पध्दती, मान-शौर्य पध्दती, अर्थ पध्दती, दुर्जन, सुजन, परोपकार, धैर्य, दैव, कर्म अशी वर्गवारी नीतीशतकाची केलेली आहे.

श्रृंगारशतक :
ह्या शतकांत हे तारुण्यात रचलेले असल्याने तारुण्यसुलभ अश्या शृंगारीकतेने नटलेले आहे. ह्या शतकाचे साधारणत: ५ भाग कल्पिता येतात.
पहिल्या २० श्लोकांत स्त्रियांचे सौंदर्य, त्यांची मनोहर कांती, नम्रता, वगैरे गुणांची प्रशंसा केली आहे. सौंदर्य प्रसाधने वापरुन सौंदर्यात वाढ केली जाते हे ही सांगितले आहे. पुढील विस श्लोकांत रतिक्रिडेत स्त्रियांचे चातुर्य कसे दिसते हे दाखवले आहे. ह्या शतकाच्या शेवटच्या भागात मदनाच्या कामबाणांनी पराभूत झालेले साधू, संत इ. कसे वैराग्यास कारणीभूत होतात हे सांगितले आहे.

वैराग्यशतक :
हाव कशी वाईट आहे, याचक वृत्तीचा धिक्कार, योग > संयम > ब्रह्मसाक्षाक्तार यांचा पुरस्कार. नित्य आणि शाश्वत वस्तू कश्या ओळखायच्या हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे असे ह्या शतकांत सांगितले आहे. ह्याचा शेवट संयमीत जीवनात म्हणजे अवधूत जीवनाचे वर्णन ह्यात आहे.

राशी भविष्य. ओक्टो १५ ते नोव्हें १५ २००९

मेष :- शिक्षण क्षेत्रात ह्या महिन्यात मोठ्या घडामोडी होतील. काही अचानक निर्णय घेतले जातील. आपल्या धनार्जनाच्या मार्गांमध्ये ही ह्या महिन्यात मोठा बदल दिसतो आहे. मार्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. धार्मिक क्षेत्रांना भेटीगाठीचे प्रसंग येतील. मित्र मंडळीमध्ये वयाने मॊठ्या असलेल्या मित्रांचे मार्गदर्शन ह्या महिन्यात महत्वाचे आहे.
वृषभ :- लहान भावंडाकडून आपल्याला ह्या महिन्यात त्रास होण्याची शक्यता आहे. मानसिक तयारी ठेवावी. संततीच्या बाबतीत काही नवीन बाबिं कळतील. कला बहरेल. नोकरीच्या जागी अधिकारी जागांचा उपयोग करुन घेता येईल. वरिष्ठांकडून मोठ्याप्रमाणात लाभ होतील.
मिथुन :- रोख रकमांबाबतचे ह्या महिन्यात काही अचानक निर्णय घेतले जाऊन पुढील गोंधळास कारणीभूत ठरतील त्याचा विचार करावा. घर, वाहन ह्या संदर्भात आपण काही बहु परिणामकारक निर्णय घ्याल. वैवाहिक जोडीदार ह्या महिन्यात विचित्र वागेल. वाहनांसंदर्भात काही कागदपत्रे सांभाळून ठेवावीत.
कर्क :- आपल्या स्वभावात ह्या महिन्यात थोडासा तुसडेपणा येण्याची शक्यता आहे. रोख रकमांचे व्यवहार अगदी सुरळीत होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. वैवाहिक जोडीदार ह्या महिन्यात दृष्टेपणाने वागेल त्यासाठी आपण त्यांचे ऎकावे. हाडांचे विकार जोर धरतील. भावंडांकडुन होणारे गैरसमज टाळावेत.
सिंह :- आपला स्वभाव ह्या महिन्यात जरासा शांत होईल. त्यामुळे कुटूंबातील बरेच आवाज ह्या महिन्यात डोकेवर काढतील. धनार्जनाच्या मार्गात वाढ होईल. अनेक व्यवसायांचा सहभाग होईल. अचानक काही वस्तु सापडतील व आपल्याला आश्चर्य होईल. डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.
कन्या :- आपला द्वीधा असलेला स्वभाव हा महिना ह्या महिन्यात अजुनच गोंधळाचा होणार आहे त्यासाठी आपण गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मुलांकडुन आपल्याला महत्वाचे सल्ले मिळतील त्यांचा वापर करावा. मित्रांकडून कटू भाषाण ऎकून घ्यावे लागेल त्याचाही उपयोग होईल.
तुळ :- घरासंदर्भात, वाहनासंदर्भात महत्वाचे बदल होतील त्यांसाठी तयार राहा. मुलांकडून कलाविष्कार पाहावयास मिळतील.
कामाच्या ठिकाणासंदर्भात आधिकारी व्यक्तिकडून आपल्याला काही निर्णायक बाबीं ऎकाव्या लागतील. मित्रांबरोबर मजेत दिबस जातील. आपल्याकडून ह्या महिन्यात मोठे खर्च अनेक बाबींवर होतील.
वृश्चिक :- लहान भावंडांकडून आपल्याला काही महत्बाचे निर्णय दिले जातील. आपल्या धार्मिक गुरु कडून आपल्या काही पारमार्थिक गोष्टींचे आयुष्याला खुप महत्वाचे ज्ञान दिले जाईल. मित्रांबरोबर प्रवासाला जाल.आपल्या कामाच्या आधिकारी व्यक्तिंकडून खुप काळापासून अडकलेले काम पुर्ण होईल.
धनु :- आपला स्वभाव ह्या महिन्यात पुर्णपणे स्फ़ोटक बनेल. कुटूंबातील मोठ्या अधिकारी व्यक्तिंकडून आपल्या आयुष्यात केलेला हस्तक्षेप वाढेल. त्याचे कारण गुढ राहिले. आपल्याकडून महत्वाची अवजारे, चाव्या इ. हरविण्याची शक्यता आहे. स्त्री गुरु, मार्गदर्शकांकडून महत्वाचे मार्गदर्शन होईल. कामाच्या ठिकाणी कागदपत्रांसंबंधी काही कामे पुर्ण होतील.
मकर :- आपल्या स्वभावात कधीही नसलेला सम्यक विचारांचा पाया ह्या महिन्यात दिसून येईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराकडून ह्या महिन्यात विचित्र मते मांडलेली दिसतील. त्याचा अर्थ लागणार नाही. आपल्या कडून जवळच्या स्त्री नातेवाईकांच्या वस्तू हरविण्याची शक्यता आहे.
कुंभ :- आपला स्वभाव ह्या महिन्यात गुढ बनेल. धनार्जनाचे मार्ग ह्या महिन्यात टोकाची भुमिका घ्यावयास लावतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर दिवस मजेत जातील. मैत्रांबरोबरचा काळ आपण आपल्यासाठी महत्वाचा आहे गैरसमज टाळावेत.
मिन :- आपली मुले ह्या महिन्यात वादग्रस्थ भुमिका घेताना दिसतील. धनार्जन उत्तम राहिल. वैवाहिक जोडीदारासंदर्भात काही गॊधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सल्ले ह्या महिन्यात आपल्याला लाभदायक ठरतील. आपल्या लांबच्या नातेवाईकांकडुन आपल्याला ह्या महिन्यात आर्थिक फ़ायदे होतील.
शुभं भवतू !!!

आपला वारसा...सहदेव भाडळी

प्राचिन भारतीय विद्यांपैकी सर्वांनाच भुरळ पाडणारी एक विद्या म्हणजे ज्योतिष ही होय. आपल्याकडे ज्योतिष्यावर प्रचंड मोठे संशोधन झाले. परदेशी काही ज्योतिष प्रकारांचे जतन संबंर्धनही आपल्या पुर्वजांनी केले. आज त्याचे स्बरुप जरी व्यावसायीक झालेले असले तरीही, ज्योतिष्याचे आपल्या प्राचिन संस्कृतितले स्थान तसे अबाधितच म्हणावे लागेल.
आपल्या जातीव्यवस्थेच्या पगड्यामुळे ज्योतिष ही कोणे एकेकाळी उच्चजातीयांची मक्तेदारी होती. पण ह्या मक्तेदारीला शह देण्याचे अनेक प्रयत्न झाले त्यातला एक प्रयत्न म्हणजे सहदेव भाडळी हा होय.
सातशे वर्षांपुर्वी मार्तंड जोशी नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेली दोन मुले म्हणजे सहदेव-भाडळी ही होय. त्यातील सहदेव हा ब्राह्मण स्त्रीपासून तर भाडळी ही अंत्य जातीतील स्त्रीपासून झालेली मुलगी होय. तीने वडीलांकडचे ज्योतिष शास्त्राचे ज्ञान आत्मसात केले व ते नंतर सहदेवाला शिकविले. ह्याबाबत एक कथा प्रसिध्द आहे की सहदेवाने एका आध्यात्मिक उन्नतांची एक कवटी आणली होती व तो उगाळून पित होता व ती कवटी भाडळी ने ती चोरुन कुटून पिठ करुन पिऊन टाकली व तीला ज्योतिष्याचे ज्ञान प्राप्त झाले. परंतू तिच्या रचनांवरुन ही घटना सत्य असल्याचे पुरावे मिळत नाहीत. तिच्या रचनांमध्ये अनेक समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये व आधीच्या ग्रंथामध्ये प्रगट झालेले विचार आपल्याला दिसतात. तिने केलेल्या रचनेवर तिच्या सामाजिक स्थानाचा परिणाम झालेला दिसून येतो. तिचे ज्ञान हे नंतर ''सहदेव-भाडळी'' ह्या नावानेच प्रसिध्द झाले आहे. तिच्या ज्ञानाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पुन्हा तिला जातीच्या उतरंडीची मदत घ्यावीच लागली.
तिने 'मेघमाला' नावाचा श्री व्यासांनी लिहीलेला ग्रंथ प्राकृतात आणला. व पर्जन्य विचारांवर स्वत:चे असे काही विचारही मांडलेले दिसतात. तिने पर्जन्याचा विचार करताना ज्योतिष शास्त्रापेक्षा हवामान शास्त्राचा विचार जास्त केलेला दिसतो. शकून संदर्भात असलेले तिचे विचार हे रोजच्या जिवनातून ज्योतिष शास्त्राचा उपयोग कसा करावा हे प्रथमत: सांगताना आपल्या भाडळी दिसते.
श्री शाहिर हैबती घाडगे (१७९३-????) ह्यांनी तिच्या ज्ञानाचा अभ्यास केला व त्यांबर आपल्या लावण्यांमधे रचना केली. आज भाडळीचे आपल्याला उपलब्ध असलेले ज्ञान हे श्री हैवतींची देण आहे. नाहीतर आपल्या जात्यंध समाजात व काळाच्या ऒघात ते ज्ञान नाश पावले असते.
भाडळीच्या ह्या रचनांमध्ये आपल्याला तत्कालिन समाजास आधुनिक वाटणारे अनेक विषय तिने हाताळलेले दिसतात. त्यांत गांधर्व विवाह, शल्यचिकित्सा, आयविचार, पिकांवरील रोग व त्यांवरील उपचार, आरोग्य व ज्योतिष, पर्जन्याचे हवामान शास्त्राने केलेले विबेचन, स्त्री-प्रशंसा इ. अशी ही भाडळी ज्ञाननिर्मिती करुनही कवटी चोरण्याच्या आरोपाने धुर्त अशी मंडीत केली जाते...
आपल्या जुन्या मराठी ज्ञाननिर्मितीकारांमध्ये हे ही एक रत्न आपल्याला जोडता येते...