Friday, October 16, 2009

ओळख शतकत्रयाची

ओळख शतकत्रयाची
दिक्कालाद्यनवच्छिन्नानन्तचिन्मात्रमूर्तये ।
स्वानुभूत्येकसाराय नम: शान्ताय तेजसे ॥

जो दिशा, भूत, भविष्य, वर्तमानकाल यांहींकरुन परिच्छेदरहीत म्हणजे अमक्या प्रदेशात अमूक काली होता. आहे किंवा असेल. असा व्यवहार ज्याचे ठायी संभवत नाही. निरवधी ज्ञान हेच आहे. स्वरुप ज्याचे, आणि स्वकीय अनुभवच आहे मुख्य तत्व ज्याचे असा जो शांत तेजोरुपी परमेश्वर त्यास नमस्कार.

आपल्या प्राचिन संस्कृत साहित्यातील हा ही एक भाग. हि शतकत्रयी राजा भर्तृहरी ह्यानी रचली आहे असे मानले जाते. जर्मन विद्वान श्री मेक्स मुल्लर यांनी ह्या राजाचा कालावधी इ.स.६५० च्या आसपास असे मानले जाते. ह्याचे वाक्यप्रदीप व महाभाष्य टिका नावाचे आणखी काही ग्रंथ आहेत पण प्रसिध्द शतकत्रयीच आहे. ह्या शतक त्रयी मध्ये नावाप्रमाणेच तीन भाग आहेत. ह्यामध्ये नीती, शृंगार, वैराग्य अशी तीन शतके आहेत. प्रत्येकी शंभराच्या आसपास श्लोक आहेत. काही शतकात जसे की नीतीशतकात ११७ श्लोक आहेत. व श्रृंगार शतकात १०७ आहेत. ही शतके राजा भर्तृहरी याने आपल्या तारुण्यात श्रृंगार शतक, मध्यम वयात नीतीशतक तसेच उतार वयात वैराग्य शतक रचले असावे असे मानले जाते. संस्कृत काव्यामध्ये कालीदासानंतर राजा भर्तृहरीच जास्त प्रसिध्द मानला जातो.
व नंतर श्री वामन पंडीतांनी त्यावर आपले प्राकृत काव्य रचले आहे. ते अत्यंत संस्कृत श्लोकांच्या अर्थाला धरुन रचलेले आहे. ह्या शतकांची भाषा ऒघवती, प्रसन्न, अर्थगंभीर, सुगम, त्या भाषेत प्रसाद असून ओघ आहे शैली अकृत्रीम आहे. ह्यातील नीतीशतकातील श्लोक कायम सुभाषीत म्हणूनच वापरले जातात. नीतीशतकातील सुभाषीते म्हणजे संसारातील जीवनपथ दर्शक दीपगृहेच मानली जातात.
सिंह:शिशूरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु ।
प्रकृतिरियं सत्ववतां न खलू वयस्तेजसो हेतू: ॥
सिंह हा बाल्यावस्थेत असतानाही मदस्त्रावाने मलिन आहेत गंडस्थळे ज्यांची अशा मदोन्मत्त हत्तीवर उडी घालीतो. त्याचप्रमणे पराक्रमी जो आहे तो जन्मस्वभावानेच असतो त्यांच्या तेजास वयाचे बंधन नसते.

दौर्मन्त्र्यान्नृपतिर्विनश्यति यति: संगात्सुतो लालना ।
द्विप्रोनध्ययनात्कुलं कुतनयाच्छीलं खलोपासनात ॥
ह्रीर्मद्यादनवेक्षणादपि कृषि: स्नेह: प्रवासाश्रया ।
न्मैत्री चाप्रणयात्समृध्दिरनयात्यागात्प्रमादाध्दनम ॥

राजा वाईट प्राधानामुळे, साधू विषयलोभाने, मुलगा लाडाने, ब्राह्मण अध्ययन न केल्याने, कुळ वाईट पुत्राने, सत्स्वभाव नीच सेवेने, लज्जा मद्यपानाने, शेत न पाहिल्याने, स्नेह प्रवासाने, मैत्री प्रेम न केल्याने, ऎश्वर्य अन्यायाने, धन अव्हेर केल्याने याप्रकारे ह्या बाबीं नाश पावतात.
ह्यात आपण तीन्हीं शतकांचा क्रमाने परिचय करुन घेऊ.

नीतीशतक :
नीतीशतकाचे १०-१० श्लोकांचे भाग पाडले जातात. ह्या भागांमध्ये जीवनात वागण्याबाबतचे अत्यावश्यक असे तत्वज्ञान सापडते . ते निम्नानुसार, अज्ञपध्दती,विद्वत पध्दती, मान-शौर्य पध्दती, अर्थ पध्दती, दुर्जन, सुजन, परोपकार, धैर्य, दैव, कर्म अशी वर्गवारी नीतीशतकाची केलेली आहे.

श्रृंगारशतक :
ह्या शतकांत हे तारुण्यात रचलेले असल्याने तारुण्यसुलभ अश्या शृंगारीकतेने नटलेले आहे. ह्या शतकाचे साधारणत: ५ भाग कल्पिता येतात.
पहिल्या २० श्लोकांत स्त्रियांचे सौंदर्य, त्यांची मनोहर कांती, नम्रता, वगैरे गुणांची प्रशंसा केली आहे. सौंदर्य प्रसाधने वापरुन सौंदर्यात वाढ केली जाते हे ही सांगितले आहे. पुढील विस श्लोकांत रतिक्रिडेत स्त्रियांचे चातुर्य कसे दिसते हे दाखवले आहे. ह्या शतकाच्या शेवटच्या भागात मदनाच्या कामबाणांनी पराभूत झालेले साधू, संत इ. कसे वैराग्यास कारणीभूत होतात हे सांगितले आहे.

वैराग्यशतक :
हाव कशी वाईट आहे, याचक वृत्तीचा धिक्कार, योग > संयम > ब्रह्मसाक्षाक्तार यांचा पुरस्कार. नित्य आणि शाश्वत वस्तू कश्या ओळखायच्या हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे असे ह्या शतकांत सांगितले आहे. ह्याचा शेवट संयमीत जीवनात म्हणजे अवधूत जीवनाचे वर्णन ह्यात आहे.

No comments: